Shirdi News : सध्या संपूर्ण देशभर एका प्रकरणाची विशेष चर्चा सुरू आहे आणि ते प्रकरण आहे तिरुपती मंदिरातील लाडूंचे. तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद रुपी जे लाडू दिले जातात त्या लाडूंमध्ये चक्क जनावरांची चरबी आणि माशांचे तेल आढळून आले आहे. तिरुपती मंदिरात संपूर्ण देशभरातील किंबहुना संपूर्ण जगातील हिंदू सनातन धार्मिक लोक गर्दी करत असतात.
यामुळे जेव्हापासून ही बाब समोर आली तेव्हापासून सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. तिरुपती मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. लाखो, करोडो लोक दरवर्षी तिरुपती मंदिरात दर्शनासाठी येतात. दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर या सर्व भाविकांच्या मनाला ठेच लागली आहे.
करोडो श्रद्धाळूच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. सध्या संपूर्ण देशात या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर शिर्डी मध्ये घडलेल्या प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे.
खरे तर, तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल आढळून आले आहे. मात्र शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादात भेसळ आढळून आली होती. ऑगस्ट 2012 मध्ये शिर्डी मध्ये ही घटना घडली होती.
त्यावेळी शिर्डीमध्ये प्रसाद स्वरूपात दिल्या जाणाऱ्या लाडूंचे लाखों पाकीट नष्ट करण्यात आले होते. खरे तर त्यावेळी शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांनी प्रसाद म्हणून उपलब्ध होणाऱ्या लाडूचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली होती. लाडूमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचा आरोप भाविकांच्या माध्यमातून केला जात होता.
त्यावेळी लाडूची ही चव तुपामुळेचं खराब झाली असून तुपाच्या दर्जा संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावेळी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या एका भाविकाने असे म्हटले होते की, आम्ही इथे अनेकदा आलो आहोत. पण सध्या प्रसादात जो लाडू मिळाला, त्याची चव कडू आहे.’
तसेच दुसऱ्या एका भाविकाने असे म्हटले होते की, श्रीक्षेत्र शिर्डी येथे मिळणारा लाडू हा प्रसाद असतो, हा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे अनेक जणांना याबद्दल बोलताना संकोच वाटतो. पण लाडूची चव कडवट लागत असल्याचं अनेक दिवसांपासून जाणवत आहे.
या साऱ्या तक्रारी पाहता अन्न आणि औषध प्रशासनाने साईबाबा मंदिराच्या किचन वर छापा टाकला. त्यावेळी प्रसाद बनवण्यासाठी जे तूप वापरले जात होते त्याचा नमुना सुद्धा घेण्यात आला होता. हे सर्व नमुने त्यावेळी तपासासाठी पाठवण्यात आले होते.
मात्र या तपासातून कोणती माहिती समोर आली याबाबत अजून पर्यंत कोणालाच काही समजू शकलेले नाही. पण 2012 मध्ये त्यावेळी श्रीक्षेत्र शिर्डी येथे प्रसाद म्हणून दिले जाणारे जवळपास साडेचार लाख लाडू नष्ट करण्यात आले होते. दरम्यान आता 2012 नंतर तिरुपती मंदिरात देखील अशीच घटना समोर आली आहे.