SIP Investment Tips : आजच्या युगात आर्थिक स्थैर्य मिळवणे ही फक्त स्वप्नरंजनाची गोष्ट राहिलेली नाही, तर योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या मदतीने ते शक्य आहे. अनेक जण विचार करतात की करोडपती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात, योग्य वयात योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास आर्थिक स्वातंत्र्य सहज मिळू शकते. यासाठीच ‘१२-१५-२०’ फॉर्म्युला हा एक उत्तम मार्ग आहे.
१२-१५-२० फॉर्म्युला म्हणजे काय?
हा फॉर्म्युला तीन महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित आहे.
पहिले म्हणजे १२% परतावा, गुंतवणुकीवर सरासरी १२% वार्षिक परतावा मिळवणे. दुसरी संकल्पना म्हणजे ही गुंतवणूक दीर्घकालीन म्हणजेच किमान १५ वर्षे ठेवणे अन तिसरी संकल्पना म्हणजे २०,००० रुपये प्रति महिना सातत्याने गुंतवत राहणे.

दरम्यान, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या २५ व्या वर्षी हा फॉर्म्युला वापरून गुंतवणूक सुरू केली, तर तो वयाच्या ४० व्या वर्षी कोट्याधीश होऊ शकतो. पण कसं? तर तीच मॅजिक आता आपण पाहणार आहोत.
गुंतवणूक कुठे करावी ?
२५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून ४० व्या वर्षी कोट्याधीश व्हायचं असेल तर एस आय पी मध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. अधिक परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा भूतकाळातील परतावा, व्यवस्थापनाचा दर्जा आणि बाजारातील स्थिती यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीचा अंदाजित परतावा
SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही १५ वर्षे सातत्याने २०,००० रुपये दरमहा गुंतवले आणि त्यावर सरासरी १२% वार्षिक परतावा मिळाला तर पंधरा वर्षांनी तुम्हाला एक कोटी ९१ हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये ३६ लाख रुपये तुमची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित ६४.९१ लाख तुम्हाला मिळालेला व्याजरूपी परतावा राहणार आहे.
SIP का निवडावी?
1. रुपयांची सरासरी किंमत (Rupee Cost Averaging): बाजारातील चढ-उतारांमुळे दरमहा समान रक्कम गुंतवल्यास दीर्घकालीन लाभ मिळतो.
2. कंपाउंडिंगचा जादूई प्रभाव: दीर्घकाळ गुंतवणूक ठेवल्यास व्याजावरही व्याज मिळते, ज्यामुळे निधी झपाट्याने वाढतो.
3. लवचिकता: SIP मध्ये आवश्यकतेनुसार गुंतवणूक रक्कम वाढवता किंवा कमी करता येते.
लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे फायदे
जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करता, तितका जास्त फायदा मिळतो. चक्रवाढ व्याजामुळे तुमचा निधी वेगाने वाढतो. भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करता येते.
आता सुरुवात कशी कराल?
1. तुमच्या गरजेनुसार योग्य म्युच्युअल फंड निवडा.
2. SIP सुरू करण्यासाठी विश्वसनीय गुंतवणूक प्लॅटफॉर्म किंवा बँकेशी संपर्क साधा.
3. नियमित गुंतवणूक करा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा.
कोट्याधीश बनण्यासाठी मोठ्या वेतनाची आवश्यकता नाही, फक्त शिस्तबद्ध आणि शहाणपणाने गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. ‘१२-१५-२०’ फॉर्म्युलाचा अवलंब केल्यास तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य सहज मिळवू शकता. आजपासूनच योग्य नियोजन सुरू करा आणि उज्वल भविष्यासाठी पहिला टप्पा पार करा!