Snake News : उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. येत्या काही दिवसांनी पावसाळ्याचा सिझन सुरू होणार आहे आणि या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाळी दिवसांमध्ये सापांच्या बिळामध्ये पाणी घुसते आणि यामुळे साप बाहेर पडतात आणि मानवी वस्तीत शिरण्याची भीती अधिक असते.
हेच कारण आहे की, या दिवसांमध्ये साप चावण्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक असते. खरे तर भारतात काही बोटावर मोजण्या इतक्याचं सापांच्या प्रजाती विषारी आहेत मात्र तरीही देशात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो ही वास्तविकता नाकारून चालणार नाही.

असे म्हणतात की, आपल्या देशात दरवर्षी जवळपास सुमारे 90 हजार लोक सर्पदंशामुळे मरण पावतात. यामुळे साप दिसला तरीदेखील अंगावर काटा येतो आणि अनेकजण सापांना फारच घाबरतात.
खरे तर भारतात अनेक बिनविषारी आणि विषारी प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे. भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत, यामध्ये किंग कोब्रा हा एक सर्वाधिक विषारी साप म्हणून ओळखला जातो. दरम्यान आता सापाची एक नवीन प्रजाती सापडली असल्याची माहिती समोर आली आहे.
सापांची नवीन प्रजाती आढळली
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये सापाची ही नवीन प्रजाती आढळली आहे. किंग कोब्राची एक नवीन प्रजाती आपल्या देशात आढळली आहे.
ही प्रजाती आपल्या देशात पहिल्यांदाच आढळली असून महाराष्ट्रात आणि पश्चिम घाटात या प्रजातीचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रजातीचा अभ्यास केला असता अभ्यासकांना ही जात किंग कोब्रापेक्षा अधिक विषारी असल्याचे आढळले आहे.
नव्या प्रजातीचे नाव काय ?
मीडिया रिपोर्टनुसार, पश्चिम घाटात आढळलेल्या या नवीन प्रजातीचे नाव ओफियोफॅगस कलिंगा एसपी नोव असं आहे. या जातीबाबत संशोधकांनी अशी माहिती दिली आहे की हा नवा किंग कोब्रा काळ्या रंगाचा आहे. त्याच्या शरीरावर पिवळ्या रेषा आहेत.
तसेच, त्याच्या पोटाकडील भाग हा थोडा हलक्या पिवळ्या रंगाचा सुद्धा आहे. हा साप इतर जातींपेक्षा आकाराने थोडासा मोठा आहे. हा नवीन साप किंग कोब्रापेक्षाही आकाराने मोठा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा साप दिसायला फारच खतरनाक दिसतो आणि याला पाहताच लोक घाबरू शकतात.
कुठे आढळून येतो नवीन साप
संशोधकांनी या नव्या जातीच्या सापाबाबत अधिक माहिती देताना असे सांगितले की, हा साप आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आढळून आला आहे. दक्षिण पश्चिम घाट, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या क्षेत्रांमध्ये हा साप दिसून आला आहे आणि तो फक्त घनदाट जंगलात राहतो अशी सुद्धा माहिती संशोधकांकडून देण्यात आली आहे.