Sujay Vikhe Patil News : शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. असे विधान माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतेच केले. या वादग्रस्त वक्तव्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांची अडचण वाढली. महायुती मधील नेत्यांनी देखील सुजय विखे पाटील यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली. शिंदे गट यामध्ये पुढे होता. दरम्यान आता या वादग्रस्त वक्तव्यावर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलयं. सुजय विखे पाटील यांनी मराठी भाषेचे प्रत्येकजण वेगवेगळे अर्थ काढतो.
जेव्हा मी भिकारी या शब्दाचा उल्लेख केला त्यामध्ये आपण जर पोलीस स्टेशन कडून प्राप्त झालेली अधिकृत माहिती काढली तर मागच्या तीन वर्षात जवळपास 4000 भिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करून त्यांना सुधार गृहात पाठवले आहे. भिकारी याचा अर्थ साईभक्त ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते यांना हिनवण्याचं पाप कुणीच करू शकत नाही. साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयचं आहेत मग कुणीही येवो. आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे जे पोलिसांच्या अहवालामध्ये सांगितलं जातं.
दुसरी गोष्ट अशी की जे बाहेर राज्यातून आलेले लोक आहेत बिहारचे असतील किंवा इतर राज्यातील असतील जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत जे कदाचित भिकाऱ्याचे सोंग घेतात किंवा रस्त्यावर पडलेले असतात व्हाइटनर म्हणून एक प्रकार आहे त्याचा नशा करतात. त्यांनी मुलीची छेड काढणे, त्यांनी मुलांवर अत्याचार करणे, परवाच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली. मला शिर्डी विधानसभेमध्ये माझ्या महिला भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून मी परत एकदा संस्थांनला विनंती करतो की हे जेवणाचं, प्रसादालयाचे जे भोजन आहे याला दहा रुपये करण्याचा उद्देश एवढाच की जेवणाचे मूल्य केलं जाईल, जेवण वाया जाणार नाही आणि दुसरा मुद्दा माझा स्पष्ट आहे की जे जेवण साईबाबा संस्थानमध्ये परप्लेट तीस ते पस्तीस रुपय खर्च करून तयार होतं ते जेवण आपण दहा रुपये प्रमाणे भक्तांना देवावे.
कारण हा इतर देशातून आलेल्या साईभक्तांचा पैसा आहे आणि या पैशाचा वापर प्रसादापेक्षा आमच्या परिसरातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा, शिर्डीच्या विकासासाठी व्हावा, शिर्डी लगतच्या गावांसाठी व्हावा. म्हणून ही मागणी करण्यात कुठली चूक नाही. आता मुलींचे शिक्षण होऊ नये अशी कुणाची इच्छा आहे. त्यामुळे साई भक्तांना हिनवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. साई भक्त हे आदरणीय आहेत. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड मिळेल की किती अपराधी जे पकडले गेलेत ते भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक होते. मी याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून घेऊन अधिकृतरित्या जाहीर करणारचं आहे. ज्याने की हा विषय पूर्ण क्लिअर होईल.
तुम्ही जर माझ्या भाषणाची क्लिप पाहिली तर माझ्या अगोदर ग्रामस्थांनी याचा उल्लेख केला. ग्रामस्थांनी मला याबद्दल बोलायला लावलं म्हणून मी याचा उल्लेख केला. ही जनतेची, शिर्डी मध्ये राहणाऱ्यांची भावना आहे की अशाप्रकारे मोफत जेवणामुळे अपराधी प्रवृत्तीची लोक, अनवांटेड लोक, जे इथले ग्रामस्थ नाहीत, साईभक्त नाही त्यांची वाढ होत आहे आणि त्यांचा त्रास हा ग्रामस्थांना होतोय, म्हणून हा त्रास थांबवला जावा. मोफत जेवणामुळे, जेवणाचे मूल्य नसल्यामुळे हे जेवण अतिरिक्त फेकले जातं. त्याच्या कचऱ्याची विल्हेवाट करण्याची जबाबदारी शिर्डी नगरपंचायतीवर येते, तो भार कमी व्हावा.
दहा रुपये हे मोफतच आहे पण तरी त्याच मूल्य केलं जाईल आणि संस्थांनचा जो पैसा खर्च होतो तो योग्य ठिकाणी वापरला जाईल अशी आमची त्यात भावना आहे. भक्ताच्या पैशातून जर ही व्यवस्था चालत असेल तर दहा रुपये भक्तांना द्यायला काही हरकत नाही आणि यात कुठलीचं शंका देखील नाही. साईबाबा संस्थान ज्याची जबाबदारी ही सर्व शिर्डी चालवण्याची आहे त्या शिर्डीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांचा त्या पैशांवर अधिकार नाही का? आमच्या ज्या मुली आहेत त्यांनी चांगले शिक्षण घ्याव, स्पर्धा परीक्षेत भाग घ्यावा, कोचिंग क्लासेस सुरू व्हावेत असा त्यांचा अधिकार नाही का? मूळ शिर्डीची रचना शिर्डीच्या ग्रामस्थांनी केली.
साईबाबा शिर्डीत आलेत तेव्हा येथील ग्रामस्थ त्यांच्याबरोबर होते. साईबाबांची पण ज्या भागामध्ये मी राहिलो त्या भागाचा विकास व्हावा ही भावना होती. माझा आक्षेप कशावरच नाहीये जेवण मोफत द्यायचं देऊ शकता. पण जेव्हा संस्थांनाकडे आम्ही आमचे प्रश्न घेऊन जातो तेव्हा संस्थान म्हणत आमच्याकडे पैशांची उपलब्धता नाही. तर आम्ही त्यांना एवढंचं सांगितलं की या जेवणासाठी दहा रुपये घेतल्याने जी पैशांची बचत होईल त्या पैशांचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा. ही माझी माफक अपेक्षा आहे. मी या भूमिकेशी ठाम राहणार आहे.
या वक्तव्याने कुठल्याही साई भक्ताला हिनवण्याच कुठलही कारण नाही. जे आजपर्यंत कधी केलं नाही ते आज का करणार. आमच्या या मागणीचा उद्देश कदाचित बाहेरच्या लोकांना लक्षात येणार नाही, वाढत्या गुन्हेगारीचा परिणाम हा भयंकर आहे. आज आम्ही कितीही जरी मोठे झालो तरी माझ्या मुली सुरक्षित नसतील तर माझ्या मुली सुरक्षित ठेवण्यासाठी जे जे बदल करणे आवश्यक आहे त्याची मागणी नागरिक या नात्याने करत राहणार. कारण आम्हाला इथं राहायचं आहे. मी शिर्डी प्रसादालयात पन्नास रुपये भरून जेवण करतो माझ्याबरोबर जे कार्यकर्ते असतात तेही पैसे भरून जेवण करतात. तिरुपतीला मोफत जेवण मिळत नाही मग शिर्डीत मोफत जेवण कां दिल जाव म्हणून ही मागणी केली असून कुणाची अवहेलना करण्याचा माझा उद्देश नाही.