भारतामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला विविधतेत एकता दिसून येते तशी ती महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला दिसून येते. ही विविधता प्रामुख्याने आपल्याला भाषा तसेच संस्कृती,परंपरा, भौगोलिक परिस्थिती तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती व प्राणी संपत्ती इत्यादी बद्दल दिसून येते. तसेच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर पीक लागवडीच्या बाबतीत देखील आपल्याला विविधता दिसून येते.
ज्याप्रमाणे केळीच्या उत्पादनासाठी जळगाव जिल्हा ओळखला जातो. अगदी त्याचप्रमाणे द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्ह्याची ओळख संपूर्ण जगात आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये असे एक गाव आहे की त्याला टोमॅटोचे गाव म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. या गावाचे नाव तडवळे असून ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आहे. या गावाची प्रमुख ओळख टोमॅटो असून या ठिकाणाचे शेतकरी टोमॅटो पिकवतात आणि कोट्यावधींची उलाढाल या माध्यमातून करतात.
सातारा जिल्ह्यातील तडवळे आहे टोमॅटोचे गाव म्हणून प्रसिद्ध
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तडवळे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेले गाव असून या ठिकाणाचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन घेतात. या ठिकाणच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सूत्रच असे आहे की,ते टोमॅटो आमचा व आम्ही पिकवलेल्या टोमॅटोचा दरही आमचाच आणि इतकेच नाहीतर टोमॅटोची विक्री देखील शेताच्या बांधावरूनच अशा पद्धतीने त्यांची टोमॅटोची सगळी प्लॅनिंग आहे.
या गावचे शेतकरी एकत्रितपणे टोमॅटोचे उत्पादन घेऊन मुंबई व पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून स्वतः टोमॅटोचा दर ठरवतात व त्यानुसार संपूर्ण आर्थिक व्यवहार करतात. टोमॅटोमधील या अर्थकारणामुळे तडवळे या गावाला आता टोमॅटोचे गाव म्हणून प्रसिद्धी मिळू लागली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे एकीचे बळ व त्यांनी सुरू केलेले उपक्रम वाखाणण्याजोगे असून ते संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे.
कशी आहे इथल्या शेतकऱ्यांची आयडिया?
तडवळे गाव हे बागायती शेत जमिनीचे गाव म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते व या ठिकाणचे सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन घेतात. या ठिकाणाहून दररोज भाजीपाला आणि टोमॅटो भरून अनेक ट्रक मुंबई तसेच वाशी व पुणे मार्केट यार्डमध्ये जातात. परंतु इतर भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटोचा वाटा लक्षणीय असा आहे. तडवडे या गावांमध्ये दोनशे एकर पेक्षा जास्त शेतजमिनीवर टोमॅटो पिकाची लागवड केली जाते.
विशेष म्हणजे सर्व तरुण शेतकरी एकत्र मिळून टोमॅटोची शेती करतात. जर एकूण गावातील शेतकऱ्यांपैकी पाहिले तर 80 ते 90% तडवळे या गावचे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. कारण टोमॅटो हे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारे पीक असून त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांनी सर्वत्र टोमॅटोची शेती करायला सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे या गावचे तरुण शेतकरी नोकरी न करता शेतामध्ये टोमॅटो लागवड करतात व वर्षभरात नोकरीत जेवढे पैसे कमावणार नाहीत तेवढे पैसे टोमॅटो शेतीतून कमी वेळेत कमवतात. त्यामुळे या ठिकाणी टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.