Vande Bharat Express Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. वंदे भारत ट्रेन ही 2019 मध्ये सुरू झाली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.
आतापर्यंत देशातील अनेक राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली असून ज्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे त्या गाड्यांना रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून भरभरून असा प्रतिसाद सुद्धा दिला जात आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद , सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, नागपूर ते बिलासपुर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही ट्रेन सुरू आहे.
दरम्यान आता महाराष्ट्राला लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट सुद्धा मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव रेडी करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे विभागाने नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या दोन मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित केली असून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
मध्य रेल्वेचे नागपूर विभागाचे नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, देशभरातील रेल्वेच्या सर्वच विभागाने वंदे भारत स्लीपर ट्रेन ही त्यांच्या विभागात सुरू करण्याची मागणी केली आहे.
आम्ही सुद्धा महाराष्ट्रातील तीन महत्वाच्या शहरादरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन गाडी चालवण्यासाठी आग्रही आहोत. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करण्याता यावी, असा प्रस्ताव नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे.
नक्कीच रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाठवलेला प्रस्ताव मान्य केला तर नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास आगामी काळात सुपरफास्ट होणार आहे. परंतु नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय हा सर्वस्वी रेल्वेबोर्डाचा राहणार आहे, यामुळे आता रेल्वे बोर्डाच्या निर्णयाकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे.