Ahilyanagar News : साधारणपणे उष्णतेसाठी ओळखला जाणारा मे महिना यंदा अवकाळी पावसामुळे चर्चेत आला आहे. मागील २७ वर्षांत प्रथमच मे महिन्यात पावसाची शंभरी पार झाली असून, आतापर्यंत तब्बल १०४.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा अनेकपटीने अधिक असून, मान्सूनपूर्व पावसाचा प्रारंभ अवकाळीनेच केल्याचे चित्र दिसत आहे.
सामान्यतः मे महिन्यात सरासरी १८.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा, मे महिना संपण्याआधीच पावसाने विक्रमी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे १९९८ ते २०२५ दरम्यान केवळ चार वेळा मे महिन्यात ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली होती, आणि यंदा ती पातळीही पार करून १०० मिमीच्या पुढे गेली आहे.

२४ मे रोजीच केरळमध्ये मान्सूनची एंट्री
दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून केरळमध्ये येण्याची वेळ जून पहिल्या आठवड्यात अपेक्षित होती. मात्र, यावर्षी मान्सून २४ मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तो ५ किंवा ६ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्या आधीच, ५ मेपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर चांगलाच जाणवत आहे.
नेप्ती मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद
जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
नेप्ती: १५०.२ मिमी
चास: १४५.२ मिमी
वाळकी: १२५ मिमी
केडगाव: ११९.६ मिमी
रुईछत्तीसी: ११४.७ मिमी
तसेच पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्येही १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
१७ ते २४ मेदरम्यान ६७ मिमी पावसाची नोंद
मेच्या पहिल्या पंधरवड्यात (१ ते १६ मे) ३७.९ मिमी पाऊस झाला होता. मात्र १७ ते २४ मे या अवघ्या आठ दिवसांत ६७.१ मिमी पावसाचा विक्रमी वर्षाव झाला. १९९९, २००४, २००६ आणि २०२५ या वर्षांतच पाऊस ५० मिमीच्या वर गेला असून, यंदाच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
पिकांचे नुकसान, तर काहींना फायदा
गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पारनेर, शेवगाव, पाथर्डी व संगमनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. मात्र, नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. विशेषतः गोदावरी आणि प्रवरा नद्यांच्या काठावरील गावांमध्ये सतत दोन-तीन तास पावसामुळे मातीतील ओलावा वाढला आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. परिणामी, लग्न समारंभात अडथळे, कांदा पिकांचे नुकसान, आणि बसस्थानक परिसरात चिखलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
पाथर्डी तालुक्यात आतापर्यंत १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय, काही भागात वादळी वाऱ्यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मशागत कामांना वेग आला आहे.