Ahilyanagar Rain News : मे महिन्यात ज्या काळात उन्हाळ्याच्या झळा जाणवायला हव्या, त्याच काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीचे सावट निर्माण झाले आहे. वाढता पाऊस, नदी-नाल्यांना आलेला पूर आणि गावांची वाढती धोक्याची स्थिती यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्जतेची तयारी केली असून, संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी व्यापक नियोजन राबवले जात आहे.
पूरप्रवण गावांमध्ये सतर्कता वाढवली
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा, घोड, सीना या प्रमुख नद्यांच्या काठावरील तब्बल २२३ गावे पूरप्रवण क्षेत्रात मोडतात. या गावांतील जनतेचे प्राण व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ५०० ‘आपदा मित्र’ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे स्वयंसेवक पूरग्रस्तांना मदत करणे, सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे आणि आपत्कालीन सेवांमध्ये सहकार्य करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडतील.

आपत्ती व्यवस्थापनासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची तयारी
पूरस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्रीची खरेदी व तैनाती करण्यात आली आहे. यात ५०० लाईफ जॅकेट, १५० लाईफ बोया, १२ सर्च लाईट, १४ स्ट्रेचर, १२ पोर्टेबल तंबू, ६ फर्स्ट एड किट्स, १४ अस्का लाईट, ३० सेफ्टी हेल्मेट आणि ५० रॅपलिंग दोरांचा समावेश आहे. सात ठिकाणी इन्फ्लॅटेबल रबर बोटीही ठेवण्यात आल्या आहेत, ज्या पुरात अडकलेल्या नागरिकांचे जलमार्गाने स्थलांतर करण्यात उपयोगी ठरणार आहेत.
नियंत्रण कक्ष आणि हवामान निरीक्षण केंद्रांची उभारणी
जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा ०२४१-२३२३८४४, २३५६९४० यांचा वापर करता येईल. पावसाची नेमकी टक्केवारी व स्थिती समजण्यासाठी जिल्ह्यातील १२४ महसूल मंडळांमध्ये ‘महावेध’ प्रकल्पांतर्गत हवामान निरीक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
सर्वात संवेदनशील
श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातील आर्वी बेट हे अतिशय संवेदनशील क्षेत्र मानले जाते. पावसाळ्यात भीमेत ४० हजार क्यूसेकपेक्षा अधिक विसर्ग झाल्यास या बेटाचा संपर्क बाहेरील जगाशी तुटतो. येथे सुमारे ४०० एकर परिसर असून, १५० नागरिक वास्तव्य करत आहेत. अशा वेळी त्यांच्यासाठी औषधे, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा पूर्वतयारीने केला जातो. तसेच स्थानिक युवकांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, आपत्कालीन वेळेस बोटीद्वारे बचाव कार्याची प्रभावी अंमलबजावणी करता येईल.
नागरिकांनीही घ्यावी सजगतेची भूमिका
प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत असताना, नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पूराचा धोका निर्माण झाल्यास तात्काळ नजीकच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाणे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. कोणतीही खबरदारी न घेतल्यास संकट अधिक गडद होण्याची शक्यता असते.