मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत आहे. सुरवातीला दोन दिवस चालेल असे वाटत असताना जवळपास आठवडाभर अवकाळी पावसाने हजेरी लावली. काल शुक्रवारी (दि.१ डिसेंबर) नगर शहरासह जिल्ह्याला पुन्हा झोडपले. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
अशी होती नगर शहरात परिस्थिती
गुरुवारी अवघ्या दोन तासांत सावेडी उपनगरात ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. केडगाव उपनगरात ४५ मिमी तर नालेगाव परिसरात २६ मिमी पाऊस झाला. भिंगार उपनगराला देखील पावसाने झोडपले. भिंगारमध्ये १५ तर नागापूर उपनगरात ६ मिमी पाऊस झाला.
तालुक्यांतील स्थिती
जामखेड तालुक्यात सर्वाधिक ३७.५ मिमी, नगर तालुक्यात साधारण ३२ मिमी पाऊस झाला. पारनेर २२, श्रीगोंदे २७, कर्जत २९, शेवगाव २९ पाथडों २०, नेवासे १८ मिमी पाऊस झाला. तर दैवदैठणमध्ये सर्वाधिक ८६ मिमी पाऊस नोंदवला गेला.
पावसाने पंचनामे पुन्हा रखडले
अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान केले. जिल्ह्यात एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले होते. यात २९ हजार हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुक्सान झाले आहे. सध्या शासन याचे पंचनामे करत आहे.
परंतु गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी शहरासह तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पंचनामाची कामे थांबली आहेत. पाऊस थांबताच पुन्हा एकदा पंचनामे सुरु करण्यात येतील.
पाऊस उघडण्याची शक्यता
जिल्ह्यात ३ ते ६ डिसेंबर दरम्यान ग्रीन अलर्ट असल्याने पाऊस पडणार नाही. आता शक्यतो पाऊस संपला असे म्हटले जात आहे.
शहरातील रस्त्यांवर अर्धा फूट पाणी
शुक्रवारी सायंकाळी प्रचंड झालेल्या पावसाने नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाका व संजोग लॉन परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. दिल्ली गेटसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही पाणीच पाणी साचले होते. मोठी वाहतूक कोडी झाली होती. रस्त्यावर साधणार अर्धा फूट पाणी साचले होते.