Monsoon session : मान्सूनने अडवली खरिपाची वाटचाल ! लागवडीचे क्षेत्रफळ घटले

Ahmednagarlive24 office
Published:

Monsoon session : नैऋत्य मान्सूनच्या संथ वाटचालीचा परिणाम पेरण्यांवर झाला आहे. विद्यमान खरीप हंगामात भात लागवडीखालील क्षेत्रफळ २६ टक्क्यांनी कमी होऊन २६.५५ लाख हेक्टरवर आले आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत ३६.०५ लाख हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड झाली होती, असे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. सलग तीन वर्ष ला निनो परिस्थितीला तोंड दिल्यानंतर या वर्षी एल निनोची परिस्थिती आहे.

पण तरीही मान्सून सामान्य असेल, असा अंदाज हवामान खात्याने आधी वर्तवला होता. एल निनोच्या तुलनेत ला निनो मुळे मान्सूनच्या काळात चांगला पाऊस येतो. भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन केरळमध्ये साधारण १ जूनच्या सुमारास होते.

पण यावर्षी मान्सून विलंबाने म्हणजे ८ जून रोजी केरळात दाखल झाला. भात हे मुख्य खरीप पीक आहे, ज्याची पेरणी सामान्यतः नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीपासून सुरू होते. देशातील एकूण तांदूळ उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के उत्पादन खरीप हंगामातून येते.

परंतु सध्या तरी भात लागवडीखालील क्षेत्रफळ घटलेले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. केवळ भातच नाही तर कडधान्य लागवडीखालील क्षेत्रदेखील घटून ते गेल्या वर्षातल्या याच कालावधीतील १८.५१ लाख हेक्टरवरून १८.१५ लाख हेक्टरवर आले असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

भरड तृणधान्याच्या क्षेत्रात मात्र वाढ होऊन ते याच काळात २२. ४१ लाख हेक्टरवरून ३६.२३ लक्ष हेक्टरवर गेले आहे. तेलबियांचे क्षेत्र १८.८१ लाख हेक्टरवरून वाढून २१.५५ लाख हेक्टरवर गेले आहे.

मागील वर्षीच्या ४७.०४ लाख हेक्टरच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र आतापर्यंत ४०.४९ लाख हेक्टरपर्यंत घसरले आहे. उसाचे क्षेत्रफळ ५२.९२ लाख हेक्टरच्या तुलनेत ५४.४० लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. सर्व प्रमुख खरीप पिकांखालील एकूण एकरी क्षेत्र ३० जूनपर्यंत २०३.१८ लाख हेक्टर लागवडीखाली असल्याचे या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe