प्रेमविवाहासाठी आजही अनेक तरुण-तरुणींना घरच्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागते. कधीकधी विरोध एवढा टोकाचा असतो की, प्रेमीयुगुळ पळून जात नवे आयुष्य जगण्याचे ठरवतात. मात्र ते वाटते तेवढे सोपे नसते. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे राहायचे कुठे? काहींंच व्यवस्थित मार्गी लागते मात्र अनेकांना याबाबतीत हतबल होऊन माघारी फिरावे लागते.
अशा पळून जाणाऱ्या जोडप्यांना आसरा देणारे हिमाचल प्रदेशातील एक मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या शांघड गावातील हे शंगचूल महादेव मंदिर पळून आलेल्या जोडप्यांना आश्रय देते. त्याची खासियत म्हणेज जोडपे पळून येऊन या मंदिरात पोहोचले तर ते तिथे असेपर्यंत त्यांना कुणीही हात लावू शकत नाही.


या मंदिराचा परिसर अडीच एकर असून तिथे येणाऱ्या प्रेमीयुगुलांना शंगचूल महादेवाच्या चरणी आाल्याचा मान मिळतो. या मंदिरात येणाऱ्या जोडप्यांच्या समस्या दूर होईपर्यंत त्यांना तिथेच राहू दिले जाते. त्यांची काळजी घेतली जाते. हे सगळे मंदिरातील पुजारी करतात.
याबाबत असे सांगितले जाते की, अज्ञातवासाच्या काळात पांडव याच ठिकाणी आले होते. त्यावेळी कौरव त्यांच्या मागे तिथे गेले होते. त्यावेळी शंगचूल महादेवाने कौरवांना अडविले होते. त्यानंतर ते परतले होते. तेव्हापासून समाजाने दूर लोटलेले लोक व प्रेमीयुगुलांचे तिथे रक्षण केले जाते. त्यांना आश्रय दिला जातो.