अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- साई संस्थान रूग्णालयातील नॉन कोविड सेवा प्रशासनाच्या हट्टामुळे धोक्यात आली आहे़. दोन्ही रूग्णालयाऐवजी पूर्वीप्रमाणे कोविड रूग्णांवर स्वतंत्र इमारतीत उपचार करणे आवश्यक झाले आहे़.
सध्या साईबाबा रूग्णालयात कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या साईनाथ रूग्णालयात ही सेवा सुरू होणार आहे. वास्तविक ही रूग्णालये नॉन कोविडच्या विविध उपचारासाठी अत्यावश्यक आहेत.
सध्या साईबाबा रूग्णालयात जवळपास ९० कोविड रूग्ण ॲडमिट आहेत. त्यामुळे या रूग्णालयात कोविड पेशंट व त्यांच्या नातेवाईकांचा सर्रास वावर सुरू आहे.
यामुळे रूग्णालयातील कर्मचारी वर्ग मानसिक दबाव व भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. त्यातच या रूग्णालयात अन्य रूग्ण ही आहेत. मुळातच रूग्णावस्थेत प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते.
यामुळे या रूग्णांनाही कोविडची बाधा तत्काळ होऊ शकते. दोन्ही रूग्णालये शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने कोविड रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून संसर्ग पसरण्याची भीतीही कायम आहे़ साईबाबा रूग्णालयात ट्रॉमा युनिट,
हृदयशस्त्रक्रिया सारख्या तातडीच्या रूग्णांसह अतिदक्षता विभाग, डायलेसिस, विविध शस्त्रक्रिया, दंतरोग विभाग यांचा समावेश आहे़ तर साईनाथ रूग्णालयात प्रसुती, सिझेरीयन, डोळे,
कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील उपचार, बालरोग, होमिओपॅथी तसेच आयुर्वेदिक विभाग आहेत. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या पाहता प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम