अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 1 मे या दिवशी ग्रामसभा नको असे धोरण निश्चित झालेले असताना ग्रामविकास विभागाने हे परिपत्रक काढणे ही विसंगती असून ग्रामसभा आयोजनाचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केली आहे.
याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पात्र पाठविण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने 2 ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याची परवानगी दिली आहे. ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने ग्रामसभा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, सरकारच्या या निर्णयाला राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 ने विरोध दर्शविला आहे. ग्रामसभा घेण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आलेले असून मे, ऑगस्ट, ऑक्टोबर महिन्यात तसेच 26 जानेवारीला ग्रामसभा घेण्यात याव्यात असे स्पष्टपणे नमूद आहे.
असे असताना मागील शासन निर्णय संदर्भ विचारात न घेता पुन्हा पुन्हा नव्याने पत्र, परिपत्रक काढले जातात. त्यामुळे या ग्रामसभा धोरणाची यशस्वी अंमलबजावणी होत नाही.
27 एप्रिल 2018 च्या धोरणाची अंमलबजावणी करून 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेचे पत्रक रद्द करावे. संपूर्ण राज्यामध्ये कुठेही 2 ऑक्टोबरला ग्रामसभा होणार नाहीत.
नगर जिल्ह्यात सुद्धा 2 ऑक्टोबरला ग्रामसभा न होता संपूर्ण ऑक्टोबर महिन्यांमध्ये आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये रीतसर ग्रामसभेचे आयोजन करण्यात येईल.
त्यामध्ये सर्व विषय सूचिनुसार अंमलबजावणी करण्यात येईल. तरी ग्रामसेवकांना कोणीही सक्ती करू नये, असेही ढाकणे यांनी म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम