अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत मालेगाव डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी कारवाईची मागणी करत एका व्यक्तीने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
या बहुचर्चित घटनेची सविस्तर माहती अशी की, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका तीस वर्षीय तरुणाचा विवाह नुकताच म्हणजे महिनाभरापूर्वी 30 ऑगस्ट रोजी पार पडला.
याबाबत रत्नागिरी येथील अशोक पाटील या व्यक्तीने 25 सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात एक तक्रार दिली आहे. या तक्रार अर्जात म्हटले आहे की, मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे येथे महिन्यापूर्वी झालेला विवाह बालविवाह आहे.
याप्रकरणी लग्न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. ही कारवाई नाही झाल्यास आपण बेमुदत उपोषण करणार आहोत, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे.
त्यांनी या लग्न सोहळ्यास कृषिमंत्री दादा भुसे यांचा मुलगा उपस्थित असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम