अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शुक्रवारी सकाळी धाड टाकली.
तसेच, ईडीने तब्बल 18 तास अर्जुन खोतकर यांची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते.
त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने अर्जुन खोतकरांच्या घरावर छापा टाकला.
जालन्यातील अर्जुन खोतकर यांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात शुक्रवारी सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक दाखल झाले.
12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी सुरु केली. यावेळी अर्जून खोतकर घरीच होते, अशी माहिती आहे.
औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती.
खोतकर यांचा बंगला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही ईडीने झाडाझडती केली. किरीट सोमय्यां यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर यांच्यावर गैर व्यवहाराचे आरोप केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आज अर्जुन खोतकर ईडीने केलेल्या या कारवाई संबंधी माहिती प्रसारमाध्यमांना देणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम