अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे १९ हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारातून वाहतूक सुरु झाली आहे.
दरम्यान, रविवारी ७३४ बसेसद्वारे सुमारे १ हजार ७०३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ४ हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत ७६ लाख ३० हजार रूपयांची भर पडली आहे.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच कॉलेज व शाळकरी विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहन केले होते.
त्यांच्या या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद कर्मचाऱ्यांनी दिला आहे. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.
अनिल परब यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, परंतु त्यांची कोणी अडवणूक करत असेल,
अशा लोकांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा देत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देणार असल्याचे मंत्री परब यांनी घोषित केले होते.
राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमीवर आगारातून एसटी वाहतूक करताना आतापर्यंत ४० हून अधिक बसेस फोडण्यात आल्या आहेत. एसटीच्या आवारात बसेस अडवणे, कर्मचाऱ्यांना शिविगाळ करणे, गेट बंद करणे आदी घटनांवरून ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम