भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाली आहे. लातुरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे.

दरम्यान सासणे यांचे नाव सुरूवातीपासून चर्चेत आघाडीवर होते त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चतच मानली जात होती. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (२ जानेवारी) उदगीर येथे महामंडळाची बैठक होती.

या बैठकीत प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या महामंडळाच्या तीन घटक संस्थांनी अध्यक्षपदासाठी जी नावे सुचवली आहेत त्यात सासणे यांचे नाव होते.

याशिवाय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या ‘मनातील नाव’ही सासणे हेच असल्याने तेच अध्यक्षपदी निवडले जातील, अशी साहित्य वर्तुळातही चर्चा होती.

सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती. याआधीचे लागोपाठ तीन संमेलनाध्यक्ष निवडताना महाराष्ट्र साहित्य परिषदेने जे नाव सुचवले तेच अंतिम झाले होते. यावेळीही पुण्याच्या यादीत सासणे यांचे नाव होतेच. त्यामुळे सासणे यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe