अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- राज्यात गेल्या दोन महिन्यापासून चालू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटला नाही. अनेक ठिकाणी संप मागे घेऊन काही कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली तर काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचणेतून आत्महत्या केल्या आहेत. पण, पाथर्डी डेपोतील वाहक बाळासाहेब वायकर यांनी वेगळा पर्याय स्वीकारत हातात तराजू घेऊन भाजी विक्री सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी डेपोत २४ वर्षापासून वाहक म्हणून बाळासाहेब वायकर एसटीत नोकरीला आहेत. मिळणाऱ्या वेतन मधून आर्थिक गरजा भागत नसल्याने त्यांनी कर्मचारी सहकारी बँक मधून कर्ज काढले होते.
आधी लॉकडाऊन आणि त्यानंतर सुरू झालेला संप यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली. त्यातच आईचे आजारपण, थकलेले घरभाडे आणि बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.
मात्र, वायकर यांनी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी एका बचत गटात आहे. त्या बचत गटाकडून त्यांनी थोडे कर्ज घेतले आणि भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
पाथर्डी शहरातील मंडईत ते भाजी विक्रीसाठी दुकान थाटून बसत आहेत. त्यांना ओळखणारे शहरात अनेक जण आहेत. वायकर यांना भाजी विकताना पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले,
तर काहींनी सरकार आणि संघटनेच्या ताठर भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अशाच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला.
राज्यात आणि नगर जिल्ह्यातही अशा आत्महत्या झाल्या. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे आणि संप मिटावा, अशीच वायकर यांची भूमिका आहे.
‘गेली २४ वर्षे तुटपुंज्या पगारावर काम केले. मात्र आता कुटुंबाचे आर्थिक गणित जुळत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी वायकर यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम