शिर्डी येथे नाना पटोलेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजयुमो आक्रमक…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या पंतप्रधानांवर वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हंटले होते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर तीव्र शब्दात टिका केली आहे. तर अनेक ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत शिर्डी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्य विधान केल्याबद्दल त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिर्डी शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश गोंदकर यांनी केली आहे.

या संदर्भात गोंदकर यांच्याकडून शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान गुन्हा दाखल न केल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गोंदकर यांनी दिला आहे.

दरम्यान पुढे बोलताना गोंदकर म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अत्यंत चुकीचे विधान केले आहे. असे केवीलवाणे प्रयत्न नाना पटोले सतत करत असतात. याअगोदर देखील देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल चुकीचे विधान केले होते.

त्यामुळे अशाप्रकारे विधान करून प्रसिद्धी झोतात येण्याचे काम पटोले हे करत असतात. या विधानाचा शिर्डी शहर भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल व जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या सूचनेनुसार प्रदेश सदस्य किरण बोराडे यांच्या उपस्थितीत व शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी सकाळी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी युवा मोर्चाचे शिर्डी शहर उपाध्यक्ष प्रसाद शेलार, ओबीसी मोर्चाचे तालुका सरचिटणीस योगेश बढे, सचिव प्रशांत थोरात, हितेश मोटवाणी, अक्षय मुळे, सोशल मीडिया प्रमुख सागर जाधव, सह सोशल मीडिया प्रमुख विशाल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याने वाद वाढल्यानंतर यावर स्पष्टीकरण देत म्हणले आहे की, मी गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोललो होतो, असे म्हटले आहे. काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका.

मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे पटोले म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!