अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- नगर दौंड रस्त्या लगत गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. काम करणार्या संबंधित ठेकेदाराकडून नियोजन शून्य काम सुरू असुन रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावणे, मुरूम, माती रस्त्यावर पडल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नगर- दौंड रस्ता हा मृत्यूचा महामार्ग बनला असून येथील अपघाताची मालिका संपता संपेना असे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्यालगतच्या गावातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित कंपनीला काम करू न देण्याचा इशारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-09-at-9.13.37-PM.jpeg)
रस्त्यालगत सुरू असलेले पाइपलाइनच्या कामामुळे खंडाळा व हिवरे झरे परिसरातील गावामध्ये तर दररोज अपघात घडत आहेत. गेल्या आठ दिवसात याच परिसरात अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आक्रमक झाले असून यापुढे गॅसच्या पाईपलाईनचे काम करु देण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात अपघातामध्ये किरण टेकाडे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. तसेच पेट्रोल पंपासमोर झावरे या वृद्धास गाडीने उडवले.
मंगळवार खंडाळा शिवारात सायंकाळच्या सुमारास एक मुलगा इंडिगो गाडीला धडकला व गंभीर जखमी झाला. त्यानंतर लगेचच हिवरे झरे येथे गॅस पाईप लाईनचे बंद असलेल्या कामामुळे झालेल्या अपघातात सागर मोहारे हा तरुण मृत्युमुखी पडला आहे.
सदर रस्त्यावर जेथे काम चालू आहे तेथे अपघात होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. अपघात ग्रस्त ठिकाणी फलक, रिफ्लेक्टर व अपघात टाळण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून काळजी घेणे गरजेचे आहे.
नगर दौंड रस्त्यालगत पाईपलाईनचे काम सुरू झाल्यापासून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्य कार्ले यांनी परिसरातील संतप्त ग्रामस्थांसह यापुढे काम होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम