अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News:- जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या 2017 मधील निवडणुकीच्या वेळेस पांगरमल (ता. नगर) येथे आयोजित केलेल्या ओल्या पार्टीमध्ये दारू प्राशन केल्याने काहींना जीव गमावाला लागला होता.
अनेकांना कायमचे अंधत्व आले आहे. बनावट दारू तयार करणारे आरोपी जगजितसिंग किसनसिंग गंभीर आणि जाकीर कादर शेख यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी नगर येथील विशेष मोक्का न्यायालयात अर्ज केला होता.

न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांनी जामीन अर्ज नामंजूर केला आहे. विशेष सरकारी वकील अॅड. मंगेश दिवाणे यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले. पांगरमल दारूकांड प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी गंभीर आणि शेख यांच्या वतीने नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असल्याने जामीन द्यावा, असे म्हणणे सादर करण्यात आले.
विशेष सरकारी वकील अॅड. दिवाणे यांनी हे म्हणणे खोडून लावले. या गुन्ह्यातील भादंवि कलम 304 मध्ये जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. मोक्का कलम तिनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आहे.
आरोपींचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून दोघांचे जामीन फेटाळले.