अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Ahmednagar News :- जिल्हाधिकारी कार्यालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर जुनी इमारत पडून आहे. ती इमारत आता इतर सरकारी कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी त्या जागी असलेल्या भू-संपादन विभागाच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले होते.
त्यामुळे आता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात भू संपादन विभागास प्राधान्याने जागा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या दोन कार्यालयांच्या जागेची अदलाबदल होणार आहे.
पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने यासंबंधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शहरातील अनेक सरकारी कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत.
तर दुसरीकडे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत पडून आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी यासंबंधी विचार सुरू असल्याचे कळविल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.