आरोपीला जन्मठेपऐवजी फाशी, अहमदनगरच्या गाजलेल्या हत्याकांडात हायकोर्टाचा निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Ahmednagar News :- नगरमधील उद्योजक रमेश मुनोत व चित्रा मुनोत या दाम्पत्याची निर्घृण हत्या करून दरोडा टाकल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यात आली.

तर सुरक्षारक्षक असलेल्या मुख्य सूत्रधाराची शिक्षा फाशीत परिवर्तित करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.

अहमदनगरमध्ये ३ डिसेंबर २००७ रोजी मुनोत दाम्पत्याची निर्घृणपणे घरात हत्या करण्यात आली होती. आरोपी शिवकुमार हा मुनोत यांच्याकडे सुरक्षारक्षक होता.

पैशाच्या हव्यासापायी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत मुनोत दाम्पत्याची हत्या केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुनोत यांचे पुतणे सुनील मुनोत यांनी फिर्याद दिली होती.

जिल्हा व सत्र न्यायालयाने ६० साक्षीदार तपासून शिवकुमारसह सहाही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपींनी खंडपीठात अपील दाखल केले.

तर सरकारकडून फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी अपील दाखल केले. खंडपीठाने शिवकुमारची जन्मठेपेची शिक्षा फाशीत परिवर्तीत केली. इतर आरोपींची जन्मठेप कायम ठेवली आहे.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशीभूषण देशमुख यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयातील काही प्रकरणांच्या आधारे आणि दुर्मिळातील दुर्मिळ घटना अशी नोंद घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशीभूषण देशमुख यांनी युक्तिवादात मुख्य सूत्रधार शिवकुमार याला फाशीची शिक्षा देण्याची विनंती खंडपीठाकडे केली होती.

शिवकुमार रामसुंदर साकेत हा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला सूत्रधार आहे. तर राजू दरोडे, शैलेंद्रसिंग ठाकूर, राजेशसिंग ठाकूर, संदीप पटेल व बलेंद्रसिंग ठाकूर अशी जन्मठेप कायम ठेवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरोडे नगर जिल्ह्यातील रहिवासी आणि इतर चौघे मध्यप्रदेशातील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News