अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 maharashtra politics : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी केल्यानंतर राज्यात वातावरण तापले आहे.
गेल्यावर्षी याच काळात करोनाची दुसरी लाट तीव्र होती. त्यामुळे सर्वांचीच सर्व भेद विसरून जगण्याची धडपड सुरू होती. यावर्षी त्याच काळात वातावरण वेगळ्याच मुद्द्यावरून कलुषित झाले आहे.
यावरून आता सोशल मीडियात तुलनात्मक चर्चा सुरू झाली आहे. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
पवार यांनी म्हटलं आहे, ‘मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यांसाठी हातात हात घालून लढत होतो.
म्हणून माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत.
कुणाला वाटंत असेल ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल किंवा काहींना वाटंत असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसं होऊ देणार नाही.
फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी,’ असंही पवार यांनी म्हटलं आहे.