पुणे : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात असून पुण्यामध्ये (Pune) ब्राह्मण महासंघ (Brahmin Federation) आक्रमक होऊन राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत आहे, यावेळी आंदोलनातील महिलांनी राष्ट्रवादी विरोधात घोषणाबाजी केली आहे.
आंदोलनावेळी महिला कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. मात्र आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी त्यांना आत येण्यास अडवले. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, धक्काबुक्की आम्हालाच नाही, तर आम्हीही धक्काबुक्की केली. आम्ही त्यांच्या घरात घुसलो आणि यापुढेही त्यांच्या घरात घुसू, असा इशारा त्यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ब्राह्मण महासंघाच्या महिला यावेळी म्हणाल्या, आमच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काय उत्तर देणार, राष्ट्रवादी घाबरली आहे. आम्हाला राष्ट्रवादी येऊच देत नाही. कारण आमच्या ताकदीला ते घाबरले आहेत, असे महिला कार्यकर्त्या म्हणाल्या.
तसेच आम्ही घरात घुसून त्यांना उत्तर दिले आहे, यापुढेही घुसणार असल्याचा इशारा देण्यात आला. अमोल मिटकरी मानसिक आजारी, हाच आमचा संदेश आहे. त्यांचा निषेध आम्ही करायला गेलो, तो राष्ट्रवादीने करू दिला नाही, असेही महिला कार्यकर्त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
त्याचसोबत ज्या विषयातली माहिती नाही, त्याविषयी का बोलावे, कोणत्याही समाजावर का बोलावे, अशा वाक्यांमुळे त्यांनी त्यांची लायकी दाखवली आणि मोठ्या पदावरील मंत्री दात काढून हसतात. ज्यांनी निवडून दिले, त्यांच्यात मानगुटीवर पाय देता, असा संताप ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.