अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता उत्तर प्रदेशचे कौतूक केले आहे. महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांचे कौतुक करण्यासाठी ते दौरे करतील.
जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलेले दिसते,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तर दिली. ते म्हणाले, ‘भारतात महागाई प्रचंड वाढलेली आहे. अशावेळी विविध विषयांकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न होत आहे.
आपल्या शेजारी असलेल्या श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये देखील महागाई वाढलेली दिसते. मात्र आपल्याकडे केंद्र सरकार महागाईचे खापर राज्यांवर फोडून मोकळे होत आहे.
महागाईचे मूळ केंद्रातच आहे, हे विसरुन चालणार नाही,’ असेही पाटील म्हणाले. नरेंद्र मोदी सध्या विविध राज्यांत जाऊन वेगवेगळ्या घोषणा करीत आहेत.
मात्र, अशा पद्धतीने कोणाही एका राज्याला जास्तीचा निधी देता येत नाही. त्यासाठी योजना आहेत, पद्धत आहे. त्यामुळे या घोषणा फसव्या असतात, असेही पाटील म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अराजकीय संघटना आहे. त्यामुळे संघाचा संबंधी राजकीय घडामोडींशी जोडता येणार नाही. मात्र, भाजपकडूनच असे प्रयत्न वारंवार होतात,असा आरोपही पाटील यांनी केला.