Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध सुरू आहे. तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे.
राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. आता अशीच मागणी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
विशेष म्हणजे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशमधील नेत्यांना आवाहन करून ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध न करण्याची विनंती केली आहे.नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आठवले म्हणाले, ‘राज ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत.
त्यांच्या मोठमोठ्या सभा होतात. त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले आहे. त्यांना आता अयोध्येला जायचे आहे. मात्र, उत्तर प्रदेशाच्या लोकांचे म्हणने आहे की मुंबईत तुम्ही आमच्या लोकांना अडवत आहात. आमच्या लोकांच्या विरोधात तुम्ही बोलत आहात.
मग आम्ही तुम्हाला आमच्या भूमीमध्ये का येऊ द्यायचे? हे उत्तर प्रदेशच्या लोकांचे म्हणने चुकीचे नाही. तरीही ठाकरे यांना अयोध्येला जायचे असेल तर त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहिजे,’ असेही आठवले म्हणाले.