Maharashtra news : एका कुरिअर चालकाकडून वसुली प्रकरणात फरार असलेले मुंबईतील निलंबित पोलिस उपायुक्त तथा नगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
त्यामुळे त्यांच्याविरूद्ध लूकआउट नोटीस जारी करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.या गुन्ह्यात त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. मग त्यांनी वकिलामार्फत थेट सर्वोच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली.

मात्र काही दिवसांनी ही याचिका मागे घेण्यात आली. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणे अपेक्षित होते, परंतु तसेही केले नाही. अटक टाळण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याने ते देशाबाहेर पळण्याची शक्यता गृहित धरून मुंबई पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची धमकी देऊन पोलिस पैसे उकळत असल्याची तक्रार अंगडिया असोसिएशनच्या वतीने पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी करून १८ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात काही पोलिसांसह त्रिपाठी यांचा नोकर पप्पू गौर यालाही अटक केली. त्रिपाठी यांचे भावोजी सहाय्यक जीएसटी आयुक्त आशुतोष मिश्रा याला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले.
त्रिपाठी यांचे वडील नीलकंठ यांच्याविरोधात पुरावे मिळाल्याने आणि तेही गायब असल्याने त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्रिपाठी यांचे गायब होणे पोलिसांना संशयास्पद वाटू लागले आहे.