Maharashtra news : धार्मिकेतेच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असताना विरोध पक्षाने एका वेगळ्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला आहे.
ज्या औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेऊन भोंग्यांवरून राजकारण पेटविले, त्याच औरंगाबाद शहरात २३ मे रोजी भाजपतर्फे पाणीप्रश्नी हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस स्वत: या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून येथील सभा गाजविली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य करून संभाजीनगर हेच त्याचे नाव असल्याने वेगळे नामंतर करण्याची गरज नसल्याचे म्हटले.
आता भाजपनेही या शहरात शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. अर्थात जनतेच्या प्रश्नावर थेट रस्त्यावर उतरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या २३ मे रोजी औरंगाबादेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने महानगरपालिकेवर हंडामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपने या शहरात वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये जाण्याचे ठरविल्याचे यावरून दिसून येते.एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या मुद्द्यावरुन टीका करताना येथील लोकांना नामांतरपेक्षा पाणी महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.