Ahmednagar News : पारनेर पोलीस ठाण्यात अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान या प्रकरणात तिला अटक करण्यासंदर्भात सरकारी वकिलांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी दिली.
अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियामध्ये खा. शरद पवार यांच्या संदर्भात अपमानास्पद शब्द वापरून पोस्ट व्हायरल केली होती. यासंदर्भात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नगर जिल्ह्यात शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकाच विषयासंदर्भात अनेक गुन्हे दाखल असतील व इतर पोलीस ठाण्याकडून अटकेची कारवाई झाली असेल, तर याच विषयासंदर्भात पुन्हा अटक करता येत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे.
तरीही यासंदर्भात सरकारी वकिलांशी चर्चा करून चितळेला अटक करता येईल किंवा कसे याबाबत अभिप्राय घेतला जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.