Maharashtra news : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर गंभीर आर्थिक आरोप केलेले पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी हे पत्र खोटे असल्याचा खुलासा पूर्वीच केला आहे. त्यामुळे याप्रकरणाचे पुढे काय होणार? असा प्रश्न पडला आहे.
यासंबंधी पत्रकारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यासंबंधी महत्वाचे विधान केले आहे. त्यासंबंधी राज्य सरकारने चौकशी सुरु केली आहे. काय कारवाई करायचे, ते चौकशीअंती ठरवू, असे वळसे पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांना सांगितले आहे.
कृष्ण प्रकाश यांनी अहमदनगर जिल्ह्यातही धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यामुळे पुण्याच्या त्यांच्यावर झालेल्या या आरोपांसंबंधी अहमदनगर जिल्ह्यातही उत्सुकता आहे. कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवडहूनहून बदली झाल्यानंतर एक पत्र व्हायरल झाले होते.
त्यांचे वाचक म्हणून काम केलेले पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने हे पत्र होते. त्यात तीन पत्रकार, तीन पोलिस निरीक्षक, चार डीवायएसपी व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या कारकिर्दीत दोनशे कोटी रुपयांची वसूली केली.
आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी त्यांनी पत्रकारांना लाखो रुपये दिले, असे आरोप या पत्रात आहेत. हे पत्र व्हायरल झाल्यावर डोंगरे यांनीही हे पत्र खोटे असल्याचा खुलासा केला व उलट याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार याची चौकशी सुरू आहे.