Ahmednagar News : अनेक भाविक आपले श्रध्दास्थान असलेल्या विविध देवस्थानच्या दानपेटीत ज्याच्यात्याच्या कुवतीनुसार दान करत असतो. जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत देखील अनेक भावीक दान करत असतात.
त्याच अनुषंगाने मागील अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत सुमारे १८८ कोटी ५५ लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
साईबाबांच्या दानपेटीत जमा होणाऱ्या दानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सात महिन्यात एवढे मोठे दान हा संस्थानच्या इतिहासात विक्रमच आहे. मागील पाच महिन्यात ४१ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे.
कोविडच्या दोन वर्षाच्या कालावधीत शिर्डी शहराची आर्थिक परीस्थिती अत्यंत बिकट झाली होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये साई मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद झाले. ते तब्बल आठ महिन्यांनी सुर झाले व पुन्हा कोविड निर्बंध सुरु झाल्याने पुन्हा बंद झाले.
त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२१ रोजी खुले करण्यात आले. साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली. निर्बंध शिथिल झाले आणि साई मंदिराने पुन्हा एकदा भरारी घेतली. ज्याप्रमाणे भाविक वाढले तसा दानपेटीतील दानाचा आकडाही वाढू लागला आहे. दिवसाकाठी हजारात येणारे दान आता कोटींमध्ये येत आहे.