अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्याच्या पठार भागावरील पिंपळगाव देपा येथे घरासमोर आलेल्या पाण्याबाबत विचारणा केली असता त्यावेळी राग अनावर झाल्याने दोन गटामध्ये शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१५) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरुन तेराजणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमन खरात (वय ६५) या त्यांचे घरासमोर आलेल्या पाण्याबाबत दीपक भिकाजी खरात, सिद्धार्थ दीपक खरात, अविनाश दीपक खरात, माया दीपक खरात, भिकाजी बळवंत खरात, चंद्रभागा भिकाजी खरात, पुजा दिलीप खरात, पुजा खरात हिची बहिण (नाव माहिती नाही) यांना विचारले असता त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सुमन यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी सुमन खरात यांनी फिर्याद दिली.
दरम्यान, अकरा वाजेच्या सुमारास भिकाजी बळवंत खरात (रा.पिंपळगाव देपा) हे त्यांच्या घराजवळ असतांना नळाचे पाणी दारात आल्याचे कारणावरुन सुमन काशिनाथ खरात, गंगाधर काशिनाथ खरात, यश गंगाधर खरात, कविता गंगाधर खरात (चौघे रा.पिंपळगाव देपा), मिना रवींद्र वाघमारे व आकाश रवींद्र वाघमारे (दोघे रा.मुंबई) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून भिकाजी बळवंत खरात यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.