Maharashtra news:संसदेत भाषण करताना अनेक सदस्यांकडून विविध शब्दप्रयोग केले जातात. त्यावरून वाद होतो. त्यामुळे अनेक शब्द असंसदीय ठरविण्यात आले आहेत. त्यांचा वापर भाषणात करता येत नाही.
त्यामध्ये आता आणखी काही शब्दांची भर पडली आहे. मुख्य म्हणजे नव्याने बंदी घालण्यात आलेल्या शब्दांवरूनच आता वाद सुरू झाला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १८ जुलैपासून सुरूवात होणार आहे.
त्याआधी लोकसभा सचिवालयाने एक नवीन बुकलेट जारी केले आहे. त्यात असंसदीय शब्दांची यादी दिली आहे. त्यानुसार आता जुमलाजीवी, बालबुद्धी, कोविड स्प्रेडर, स्नूपगेट यांसारखे शब्द लोकसभा आणि राज्यसभेत असंसदीय मानले जातील.
काही इंग्रजी शब्दांचासुद्धा यामध्ये समावेश आहे. कामकाजावेळी जुमलाजीवी, बालबुद्धी खासदार, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाये, पिठू असे शब्द वापरता येणार नाहीत. Ashamed, Abused, betrayed, corrupt, drama, hypocrisy, incompetent इत्यादी इंग्रजी शब्दही असंसदीय असणार आहेत.
जर या शब्दांचा वापर केला तर ते अयोग्य वर्तन मानले जाईल. या संकलनानुसार हरामी, काळे सत्र, दलाल, रक्त शेती, चिलम घेणे, छोकारा, कोळसा चोर, गोरू चोर, चरस पिणे, बैल हे असंसदीय शब्द असून त्याचा वापर करता येणार नाही.
याशिवाय संसदेत बोलताना ‘तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात’, ‘तुम्ही आमचा गळा घोटता आहात’, अध्यक्ष कमकुवत झाले आहेत” ‘अध्यक्ष आपल्या सदस्यांचे संरक्षण करण्यास असमर्थ आहेत’ या वाक्यांचा काही सदस्यांकडून नेहमी वापर केला जातो. आता ही वाक्ये वापरली तर ती रेकॉर्डवर घेतली जाणार नाहीत, असेही स्प्षट केले आहे.