गोदावरी कालव्यांच्या सिंचनाच्या आवर्तनासाठी पाणी सोडा

Ahmednagarlive24
Published:
in the race for Radhakrishna Vikhe Patil's ministerial post

नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोटात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक चांगली झाली आहे. धरणांमधुन गोदावरी नदीला ओव्हरफ्लो सुरु आहे. गोदावरी कालव्यांच्या सिंचनाच्या आवर्तनासाठी पाणी सोडावे, व या आवर्तनात तळे, साठवण तलाव, बंधारे भरुन द्यावेत अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जलसंपदाच्या अधिक्षक अभियंता आलका अहिरराव यांनाही पाठविले आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरु आहे. यामुळे आठवडाभरात सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. बहुतांशी धरणांमधुन विसर्ग सोडण्यात येत आहेत. गोदावरीतुन जायकवाडीच्या दिशेने आतपर्यंत 23 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. असे असताना गोदावरीचे कालवे मात्र कोरडेच आहेत.
गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. काही ठिकाणी खरीपाच्या पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी होणे बाकी आहे. पावसाचा दिड महिना उलटूनही जोरदार पाऊस न झाल्याने विहीरींच्या पाण्याच्या पातळीत अद्यापि वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची उगवून आलेली पिके भविष्यात धोक्यात येण्याची भिती असल्याची वस्तूस्थिती विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

उभी खरीप पिके, बारमाही पिके यांनी आवर्तनाची नितांत गरज आहे. त्यामुळे हे आवर्तन तात्काळ सोडावे, याशिवाय लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण होवु शकतो. ऊस लागवडी होण्यासाठी विहीरींना पाणी हवे, फळबागा यांनाही पाण्याचा प्रश्‍न निर्माण होवु शकतो. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात केवळ रिमझिम पाऊस आला. मुसळधार पाऊस नसल्याने विंधन विहीरी अथवा विहीरींना पाण्याची वाढ झालेली नाही. परिणामी लाभक्षेत्रातील शेतकरी अडचणीत येवु शकतात.
सध्या गोदावरीत विसर्ग सुरु आहे. पावसाचे आगमन नाशिक जिल्ह्यात होत असल्याने गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना सिंचनाचे पाणी तात्काळ सोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आवर्तनानंतर बंधारे, साठवण तलाव, यामध्ये पाणी सोडण्यात यावे, ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल ते सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत, अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe