‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी

Ahmednagarlive24 office
Published:

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’अंतर्गत देशभरात दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम साजरा होणार आहे. या उपक्रमाकरिता ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे सर्व मुख्याधिकारी यांना पाठवि‍लेल्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचनांबाबत कळविण्यात आले आहे.

दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, सर्व शासकीय / निमशासकीय / खासगी आस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. वरील तीन दिवसांच्या कालावधीत घरोघरी दररोज संध्याकाळी झेंडा उतरविण्याची गरज नाही.  तथापि, कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल. घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या सूचना व नियमावलीबाबत नागरिकांत जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे. जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांची मदत घेऊन स्थानिक वृत्तपत्रांत बातम्या, स्थानिक केबल, रेडिओ चॅनल, सोशल मीडिया, होर्डींग्ज, बॅनर इत्यांदी मार्फत प्रचार प्रसिद्धी करावी.

घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या संकेतस्थळावर IEC आयईसी साहित्य उपलब्ध असून http://mahaamrut.org/Download.aspx या लिंकवरुन माहिती, शिक्षण व संवाद साहित्य डाऊनलोड करावे. गावस्तरापर्यंत झेंडे वितरण, संकलन आदी कामांची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe