अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ बीजिंग : प्राणघातक कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये सोमवारी एकाच दिवशी २५ जण दगावले असून, बळींच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे.
या वैद्यकीय संकटाचा इतर देशांनीही धसका घेतला असून, अमेरिका, जपान, फ्रान्स, दक्षिण कोरिया या देशांनी उद्रेकाचे केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरातील आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण डिसेंबर महिन्यात आढळला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढतच असून, अद्याप कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने अजून किमान सहा महिने तरी या विषाणूची लागण होतच राहील, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
या विषाणूवर मात करणारे औषध उपलब्ध होण्यास अजून किमान दोन महिने तरी लागतील. तोपर्यंत शेकडो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असेल.चीनव्यतिरिक्त इतरही अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत.
थायलँडमध्ये सात, जपानमध्ये तीन, दक्षिण कोरियात तीन, अमेरिकेत तीन, व्हिएतनाममध्ये दोन, सिंगापूरमध्ये चार, मलेशियात तीन, नेपाळमध्ये एक, फ्रान्समध्ये तीन, ऑस्ट्रेलियात चार, जर्मनीत एक आणि श्रीलंकेत एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.