Maharashtra News:केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणाऱ्या कारवाईसंबंधी आधीच ट्विट करून माहिती देणारे भाजपचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच राज्यातील सिंचन घोटाळ्यासंबंधी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यावर निशाणा साधला होता.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कंबोज यांच्यबद्दलच शंका व्यक्त करीत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता कंबोज यांनी रोहित पवार यांनाच लक्ष्य करीत असल्याचे सूचक ट्विट केले आहे.

कंबोज यांनी बारामती अग्रो लिमिटेट या कंपनीचा उल्लेख केला आहे. ही कंपनी रोहित पवार यांची आहे. कंबोज यांनी म्हटले आहे की, बारामती अग्रो कंपनीचे केस स्टडी सध्या आपण हाती घेतली आहे.
आपण स्वत: या कंपनीच्या प्रगतीचा अभ्यास करीत आहोत. याचा अहवाल लवकरच जाहीर केला जाईल. या कंपनीच्या यशामागील स्टोरी यातून अभ्यासली जाणार असून ती इतरांसाठी उपयुक्त ठरू शकेल, असा सूचक मजकूर कंबोज यांनी लिहिला आहे.
आपण पवार यांच्या या कंपनीत लक्ष घालत असल्याचेच जणू त्यांनी सूचविले आहे. कंबोज यांनी अलीकडेच सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी म्हटले होते, मोहीत कंबोजबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी ओव्हरसीज बँकेत ५२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा विषय चर्चेत आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन-तीन बँकांना चुना लावला आहे.
सामान्य लोकांचा पैसा ज्या बँकेत असतो, त्याच बँकेला त्यांनी चुना लावला असेल तर त्यांच्या ट्वीटला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे? असे पवार म्हणाले होते. त्यानंतर आता कंबोज यांनी रोहित पवार यांच्या कंपनीबद्दल भाष्य केले आहे.