Milk Rate : राज्यासह संपूर्ण देशात लंपी आजाराने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. महाराष्ट्रात देखील या आजाराचा शिरकाव झाला होता आणि यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. शिवाय, पशुखाद्याच्या दरामध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना हा व्यवसाय परवडत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक अर्थातच गोकुळ दूध उत्पादक संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
दूध उत्पादक संघाने गाय आणि म्हैस दूध खरेदी दरात दोन रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ शनिवारपासून म्हणजे 11 फेब्रुवारी पासून लागू झाली आहे. याबाबत गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी माहिती दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हशीच्या 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतीच्या दुधास आता गोकुळ ने केलेल्या या दरवाढीनंतर प्रतिलिटर रुपये 49.50 असा दर दिला जाणार आहे.
आतापर्यंत 47.50 असा दर म्हशीच्या दुधाला गोकुळच्या माध्यमातून दिला जात होता. या दरवाढीनंतर गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर रुपये 37 असा राहणार आहे. आतापर्यंत हा दर 35 रुपये प्रति लिटर असा होता. दरम्यान गोकुळ दूध संघाने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
वास्तविक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पशुखाद्याच्या किमतीत झालेली वाढ, मध्यंतरी लंपी या आजारामुळे पशुधनाची झालेली हानी, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे वाहतुकीत झालेली वाढ, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मोठे नुकसान सहन करावे लागत होते.
अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना दूध खरेदी दरात वाढ होण्याचे आशा होती. याच अनुषंगाने गोकुळ दूध उत्पादक संघाने हा निर्णय घेतला असून यामुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.