Strawberry Success Story : शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी देखील नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्या पाठी लागलेलंच आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि आता रब्बी हंगामात अवकाळी मुळे शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक भुईसपाट झाले आहे.
पण शेतकऱ्यांची प्रयोगशीलता या संकटाच्या काळात देखील तशीच कायम आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्रामुख्याने महाबळेश्वर मध्ये आढळणाऱ्या स्ट्रॉबेरीचं पीक उत्पादित करून पुन्हा एकदा राज्यातील शेतकरी बांधव कठीण प्रसंगातून कशा पद्धतीने विकासाचा मार्ग चोखंदळत आहेत याच उत्तम उदाहरण समोर ठेवल आहे. स्ट्रॉबेरी वास्तविक थंड हवामानातील पीक आहे.
परंतु जिल्ह्यातील संजय जसानी या शेतकऱ्याने याची शेती गोंदिया जिल्ह्यात करून दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे संजय जसानी यांचा गोंदिया शहरात सिमेंट पाईप चा मोठा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळत त्यांनी शेतीमध्ये हा प्रयोग केला असून हा प्रयोग आता यशस्वी झाला असून लालबुंद स्ट्रॉबेरी त्यांनी उत्पादित करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे. संजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया शहरात त्यांचा सिमेंट पाईपचा व्यवसाय आहे.
परंतु निसर्गाच्या सानिध्यात त्यांना वास्तव्य करणे, शेती करणं अगदी सुरुवातीपासूनच आवडतं. हेच कारण आहे की त्यांनी व्यवसायासोबतच शेती व्यवसायात वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. शहरापासून जवळच असलेल्या चारगाव या ठिकाणी एकूण 22 एकर शेतजमीनीत ते शेती करत आहेत. शेतीमध्ये नवनवीन पिकांची लागवड त्यांनी केली आहे.
स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट तसेच इतर भाजीपाला पिकांची देखील ते शेती करतात. संजय यांनी आपल्या 20आर जमिनीत स्ट्रॉबेरीची साडेचार हजार रोपे लावली होती. यातून आता त्यांना उत्पादन मिळत असून दीड टन माल प्राप्त होईल अशी आशा त्यांना आहे. स्ट्रॉबेरी विक्रीसाठी गोंदियाच्या बाजारात ते घेऊन जात आहेत.
संजय सांगतात की जर योग्य व्यवस्थापन केलं तर स्ट्रॉबेरी शेतीतून चांगली कमाई होऊ शकते. सध्या स्थितीला जसाने 200 ग्रॅम चे स्ट्रॉबेरीचे बॉक्स तयार करून बाजारात विकत असून याला 45 रुपये प्रती बॉक्स असा भाव मिळत आहे. निश्चितच व्यवसाय सांभाळत शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहील यात शंका नाही.