Successful Farmer : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल देत नवीन हंगामी आणि नगदी पिकांच्या लागवडीवर जोर दिला आहे. काही शेतकरी बांधव पारंपारिक पिकांच्या शेती सोबतच भाजीपाला वर्गीय पिकांच्या लागवडीतून चांगली कमाई करत आहेत. असाच एक प्रयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पहावयास मिळाला आहे.
वाडा तालुक्यातील मौजे देवघर येथील शेतकऱ्यांनी जे विकेलं तेच पिकेल या धोरणाचा अवलंब करत मिरचीच्या शेतीतून लाखोंची कमाई केली आहे. देवघर येथील प्रयोगशील शेतकरी किशोर पाटील कायमच आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन ते शेती व्यवसायात बदल घडवून आणत आहेत.
किशोर यांनी यावर्षी देखील भाजीपाला लागवडीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. त्यांनी आपल्या दीड एकर शेत जमिनीत मल्चिंग पेपर अंथरून मिरचीची पीक घेतलं आहे. दीड एकरात लागवड केलेल्या मिरचीतून त्यांना आता उत्पादन मिळू लागला आहे. शिवाय बाजारात भावही बरा मिळत आहे. किशोर यांच्या मिरचीला चाळीस रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत असून त्यांना दीड एकरात वीस टन एवढे मिरचीचे उत्पादन मिळणार आहे.
सध्या स्थितीला मिरचीची काढणी सुरू असून 20 टन मिरची उत्पादित होण्याचे आशा आहे. सध्या चाळीस रुपये प्रति किलोचा दर मिळत असून असाच बाजार भाव पुढे देखील कायम राहिला तर त्यांना या दीड एकर क्षेत्रातील मिरची पिकातून तब्बल सहा लाख रुपयांची कमाई होण्याची आशा आहे. अवघ्या दीड एकरात सहा लाखांची कमाई काढत निश्चितच किशोर यांनी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.
किशोर सांगतात की, ते गेल्या 21 वर्षांपासून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून वेगवेगळी पिके घेत आहेत. यंदा देखील त्यांनी पारंपारिक पिकांसोबतच मिरची या भाजीपाला पिकाची दीड एकरात लागवड केली असून सध्या चांगला बाजार भाव मिळत असल्याने त्यांना मिरचीचे पीक फलदायी ठरले आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनी जर किशोर यांच्या प्रमाणे हंगामी पिकांची तसेच तरकारी, भाजीपाला पिकांची लागवड केली, योग्य नियोजन केलं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चितच त्यांना देखील शेतीमधून चांगली कमाई होऊ शकणार आहे.
वास्तविक, अनेक शेतकरी कमी शेत जमीन असल्याने शेतीमधून अपेक्षित असं उत्पन्न मिळत नसल्याची तक्रार वारंवार करत असतात. मात्र अवघ्या दीड एकरात किशोर यांना सहा लाखांची कमाई होणार असल्याने जर योग्य नियोजन केलं तर कमी शेतीतूनही अधिक उत्पादन मिळवल जाऊ शकत हे किशोर यांच्या प्रयोगातून सिद्ध होत आहे.