Bhaskar Jadhav : सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार भास्कर जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना विधानसभेत थेट अंगावर घेतले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. ठाकरे यांची बाजू विधानसभेत जोरदारपणे जाधव यांनी मांडली आहे.
असे असताना आज एक वेगळेच चित्र बघायला मिळाले. आज तेच विधानसभा सोडून जात असल्याने त्याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात झाली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलू न दिल्याने आणि कोणतीही लक्षवेधी न लावल्याने जाधव नाराज झाले.
त्यांनी थेट विधानसभेच्या पाऱ्यांवर डोके टेकुन नमस्कार केला आणि निधून गेले. त्यामुळे ते आता पुन्हा विधानसभेत येणार की नाही, याची जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे विधीमंडळात आक्रमक असणारे भास्कर जाधव आता विधीमंडळात पुन्हा दिसतील की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
राज्यातला शेतकरी आज संकटात आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. या संकटांमुळे खचलेले शेतकरी टोकाचे निर्णय घेऊन जीवन संपवत आहेत, असा आरोप जाधव यांनी केला. मी अधिवेशनाचा एकही दिवस चूकवत नाही. मात्र, आता विधीमंडळात येण्याची माझी इच्छा राहिली नाही.
तसेच मला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचाही आरोप जाधव यांनी केला. मनाला अत्यंत वेदना होत आहेत. मला जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. मी नियमाने बोलण्याचा प्रयत्न केला तरी माझी एकही लक्षवेधी लागली नाही. हे अत्यंत वेदनादायक आहे, असेही ते म्हणाले.