Lemongrass Farming Maharashtra : शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे अति महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनीही शेतकऱ्यांना केवळ पारंपारिक पिकांवर विसंबून न राहता बाजारपेठेचा आढावा घेत जे बाजारात विकेल तेच पिकवा असा सल्ला दिला आहे. दरम्यान प्रयोगशील शेतकऱ्यांनी देखील तज्ञांच्या या सल्ल्यावर अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करून पाहिले आहेत.
निश्चितच प्रत्येकच प्रयोग या ठिकाणी यशस्वी झालेला नाही मात्र शेतकऱ्यांनी केलेले नवनवीन प्रयोगात काही प्रयोग यशस्वी झाले असून यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. गोंदिया जिल्ह्यातही एका प्रगतिशील शेतकऱ्याने असाच काहीसा नवखा प्रयोग केला आहे. वास्तविक गोंदिया तसेच संपूर्ण विदर्भ धान उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
सोयाबीन कापूस आणि धान या तीन पिकांची विदर्भात मोठ्या प्रमाणात शेती होते. गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी धान लागवडीखालील क्षेत्र विषय सुल्लेखनीय आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मौजे सोनी येथील कैलास बिसने यांनी धान पिकाला फाटा देत लेमनग्रास म्हणजेच गवती चहा आणि सिट्रोनिला या पिकाची शेती केली आहे.
हे पण वाचा :- एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु; कसा घेणार योजनेचा लाभ, वाचा सविस्तर
विशेष म्हणजे हे दोन्ही पिके जरी नवीन असली तरी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शेतकऱ्याने या दोन्ही पिकाच्या शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. यामुळे शेतीमधला हा नवखा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे. वास्तविक गोंदिया जिल्ह्यातील हवामान या दोन्ही पिकांसाठी अनुकूल नाही. मात्र तरीही कैलास यांनी या दोन्ही पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला आणि आपल्या एक एकर शेत जमिनीत या पिकाची शेती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे या पिकाच्या शेतीतून त्यांना एकरी एक लाख वीस हजार रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.कैलास सांगतात की त्यांच्याकडे वडिलोपार्जित सहा एकर जमीन आहे. या जमिनीत ते इतर प्रयोगशील शेतकऱ्यांप्रमाणे पारंपारिक पिकांची शेती करत. प्रामुख्याने धान लागवड ते आत्तापर्यंत करत होते.
मात्र ध्यान पिकाच्या शेतीत उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा विचार केला असता हे पीक शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी त्यांनी पारंपारिक पिकांसोबतच काहीतरी नवखा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. ते सांगतात की धान पिकासाठी अधिकच पाणी लागतं. शिवाय मेहनतही अधिक घ्यावी लागते. त्यासाठी रासायनिक खतांचा वापरही अधिक करावा लागतो.
हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘त्या’ कर्जदार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपयांचे कर्ज माफ
कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि धान पिकातुन अधिकच पाणी वाया घालून मिळणारे उत्पादन याचा विचार केला असता धान पिकातून खूपच कवडीमोल कमाई होते. परिणामी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर या दोन्ही पिकांची एका एकरात शेती सुरू केली. आता त्यांना यातून चांगली कमाई होण्याची आशा आहे. ते सांगतात की लेमन ग्रास ऑइल आणि सिट्रानिल ओईल या दोन्ही उत्पादनाला बाजारात मोठी मागणी आहे. लेमन ग्रास ऑइल हे 1200 ते 1500 रुपये प्रति लिटर या दराने विक्री होते.
सिट्रानिल ऑइल देखील आठशे रुपये प्रति लिटर पर्यंत विक्री होते. वास्तविक या दोन्ही औषधी वनस्पती असून बाजारात यांना मोठी मागणी आहे. औषध, कॉस्मेटिक आणि डिटरजंटमध्ये या औषधी वनस्पतींचा वापर होत असून कमी खर्चात या वनस्पतीच्या शेतीमधून त्यांना चांगली कमाई होण्याची अशी आहे. एकरी एक लाख रुपयाचा निव्वळ नफा त्यांना यातून राहणार असून भविष्यात आपल्या सर्व जमिनीवर या दोन्ही पिकांच्या लागवडीचा उद्देश त्यांनी ठेवला आहे.
ते सांगतात की, शेतकरी बांधवांनी कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची शेती केली तर शेती व्यवसाय निश्चितच फायदेशीर ठरू शकतो. एकंदरीत कैलास यांनी केलेला शेती मधला हा नवीन प्रयोग इतरांसाठी दिशा दाखवणारा ठरणार असून शेती ही निश्चितच फायदेशीर आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.