IMD Alert : देशात सध्या अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा पारा अधिकच वाढला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पण काही भागात अवकाळी पाऊस पडला असल्याने त्या भागातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आता पुन्हा एकदा हवामानात बदल होऊन देशातील १० जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोक्याचे टेन्शन वाढले आहे.
अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तेथील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे दिल्लीतील तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.
आज दिल्लीमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दिल्लीमधील तापमान कमाल 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असू शकते.
उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही
भारतीय हवामान खात्याकडून उष्णता कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आता उष्णतेची लाट येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याने तेथील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा इशारा
पुढील काही दिवसांत पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहेमध्ये पुढील 4 दिवसांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २४ एप्रिल रोजी म्हणजेच आज केरळ आणि माहेमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील 5 दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि 26 आणि 27 एप्रिल रोजी गुजरातमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वायव्य भारतात, पश्चिम राजस्थान वगळता संपूर्ण प्रदेशात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.