बातमी कामाची ! अवकाळी पावसामुळे मान्सूनकाळात पर्जन्यमान कमी राहणार का? पहा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर

Ajay Patil
Published:
Monsoon 2023

Monsoon 2023 : राज्यात एक मार्च 2023 पासून ते एक मे 2023 पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक या पावसामुळे वाया गेले आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नात मोठी घट येणार आहे.

तसेच या पावसाचा आगामी मान्सूनवर देखील विपरीत परिणाम होईल अशी भीती काही तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. काही वडील-धाडील लोक देखील उन्हाळ्यात अधिक पाऊस पडला तर पावसाळ्यात कमी पाऊस पडतो अस मत व्यक्त करत आहेत.

यामुळे आज आपण सध्या कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे मान्सून काळात खरंच का कमी पाऊस पडू शकतो का याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच कोणत्या भागात सर्वाधिक अवकाळी पाऊस झाला आहे याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून काळात 80 टक्के पाऊस पडतो आणि उर्वरित 20 टक्के पाऊस हा हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये पडत असतो. यावर्षी मात्र 20 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला असावा असा ढोबळमानाने अंदाज लावला जात आहे.

देशातील जवळपास 80 टक्के भागात एक मार्च 2023 पासून सातत्याने भाग बदलत पाऊस सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील या काळात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले आहे.

कोणत्या राज्यात झाला सर्वाधिक पाऊस 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 राज्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे, पाच राज्यांमध्ये जास्त पाऊस तर तीन राज्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस झाला आहे. तसेच सात राज्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे तर तीन राज्यांमध्ये खूपच कमी पाऊस झाला आहे.

यामध्ये पूर्व आणि ईशान्य भारतातील सिक्किम, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये जास्त पाऊस झाला आहे तर झारखंडमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे याशिवाय मणिपूरमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे.

तसेच, वायव्य भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, पंजाब, लद्दाक, राजस्थान या राज्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे तसेच उत्तराखंड या राज्यात जास्त पाऊस पडला आहे.

याशिवाय मध्य भारतात ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात, दादरा नगर हवेली, दमण दिव, महाराष्ट्र, छत्तीसगड या ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाला आहे. तसेच गोव्यात कमी पाऊस पडला आहे.

दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगाना, पदुच्चारी या राज्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे तर तामिळनाडूमध्ये जास्त पाऊस पडला आहे.

संपूर्ण देशाचा विचार केला असता एक मार्च 2023 ते 01 मे 2023 पर्यंत 59 टक्के भागात सर्वाधिक पाऊस झाला आहे. तसेच आठ टक्के भागात जास्त पाऊस, 15 टक्के भागात सर्वसाधारण पाऊस, 13 टक्के भागात कमी पाऊस तर पाच टक्के भागात खूपच कमी पाऊस झाला आहे.

अर्थातच यावर्षी एक मार्च ते एक मे या कालावधीत भारतात खूप अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी आणि संपूर्ण विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे येत्या मान्सूनवर काही विपरीत परिणाम होणार का? तर यासाठी आपण एक आकडेवारी पाहूया.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 2014-15 या वर्षी मार्च ते मे या काळात जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस झाला यामुळे मान्सून काळात कमी पावसाची नोंद झाली. साहजिकच या वर्षी देखील मार्च ते मे या काळात अवकाळी पाऊस अधिक प्रमाणात झाला आहे.

शिवाय यंदा एलनीनोचा प्रभाव राहणार असल्याने आधीच कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे निश्चितच या अवकाळी पावसामुळे येत्या मान्सून काळात पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता काही तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe