Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले असून, त्याचे कारणही तसेच आहे. मागील वर्षी अतिवृष्टी, सातत्याने पडणारा पाऊस, यामुळे बाजरीचे पीक हाती लागले नाही.
त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील माजी सरपंच महिला शेतकरी शशिकला सोलाट व मुलगा मंडल कृषी अधिकारी जगदीश सोलाट यांनी थेट राजस्थान येथून तुर्की जातीचे बाजरीचे बियाणे आणून त्याची पेरणी केली.
या तुर्की बाजरीची सरासरी उंची दहा फुटापर्यंत असून, या बाजरीच्या कणसाची लांबी अडीच ते तीन फूट फुटापर्यंत असल्याने हे बाजरीचे पीक परिसरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षण व चर्चेचा विषय ठरले आहे. राजस्थान मधून तुर्की नावाचे बियाणे आणून वा बियाण्याची पेरणी ठिबकवर केली.
या बाजरीच्या ताटाची उंची दहा फुटापर्यंत असल्यामुळे हवेने व वादळामुळे ती पडू नये म्हणून उसासारखी किंवा कपाशीसारखी मातीची सरी करावी लागते. तुर्की जातीचे हे बाजरीचे बियाणे महाग असून, हे बियाणे महाराष्ट्रातही परिचित होऊ लागले आहे.
अनेक बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींनीदेखील या बाजरीच्या बियाणाची मागणी केली असून, आम्ही मात्र या बाजरीचे तयार झालेले बियाणे केवळ शेतकऱ्यांना देणार असल्याचे जगदीश सोलाट व शशिकला सोलाट बांनी सांगितले. या बियाणामधून एकरी २५ ते ३० विंटल उत्पन्न मिळू शकते तसेच ही बाजरी रक्त वाढीसाठी व थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय उपयुक्त असून, या बाजरीचे पीक आंतरपीक म्हणून घेऊ शकतो.