Ahmednagar News : अहमदनगर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठका सुरु आहेत. मात्र, विरोधकांचे नेतृत्व कोण करणार? त्यांचा चेहरा कोण ? असे अनेक प्रश्न आहेत.
चेहरा नसलेल्या विरोधकांच्या बैठकांवर जनता विश्वास ठेवणार नाही, असे टीकास्त्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
निळवंडेचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते
मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांनी मोदींच्या विरोधात पुढाकार घेत बैठका घेतल्या. त्या पक्षाचे अवघे दोन-तीन खासदार निवडून आले. या शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा नामोल्लेख न करता खिल्ली उडवली. निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान मोदींना रीतसर निमंत्रण देखील दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
शासन आपल्या दारी’ या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात खासदार डॉ. विखे यांनी ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पोलिसांना आधुनिक संसाधने देण्यासाठी…
या बैठकीनंतर उपस्थित पत्रकारांशी खा. डॉ. विखे यांनी संवाद साधला. शहरासह जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसात घडलेल्या खून- दरोडा या घटनांकडे लक्ष वेधले असता खासदार विखे म्हणाले, या घटना दुर्दैवी आहेत. या अचानक घडणाऱ्या घटना आहेत.
या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आधुनिकीकरणासह सक्षम करावी लागणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांना आधुनिक संसाधने देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाऊल उचलले आहे.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निरंतर आढावा
जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. जिल्ह्यात पोलीस विभागातील सर्व पदावर अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निरंतर आढावा घेतला जाईल, असा निर्वाळा त्यांनी दिला.
आमदार निलेश लंके यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही…
खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राऊतांच्या आरोपात तथ्य नाही. त्या आरोपांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले आहे. तसेच आमदार निलेश लंके यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले.