भारतामध्ये आणि महाराष्ट्रात अनेक पक्षी आणि प्राणी संग्रहालय, व्याघ्र प्रकल्प, पक्षी अभयारण्य आणि बरेच क्षेत्र ही विविध प्राण्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. आपल्यातील बऱ्याच जणांना जंगल सफारी करण्याची खूप आवड असते. यामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक पर्यटक ताडोबा सारखे व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात.
तसेच कर्नाळा अभयारण्य हे पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. अशी अनेक प्राणी संग्रहालय आणि अभयारण्य आपल्याला महाराष्ट्रात सांगता येतील. यातील सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असलेले आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय होय. या प्राणी संग्रहालयाचे वैशिष्ट्य आणि त्यातील प्रमुख प्राण्यांची माहिती आपण घेणार आहोत.
जंगल सफारी करणाऱ्यांसाठी आहे उत्तम ठिकाण
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय हे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. हे प्राणी संग्रहालय मध्य भारतातील एक प्रमुख ठिकाण असून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे केंद्र आहे. हे 115 हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेले असून मुक्त संचार करत असलेले प्राणी बघण्याची सुवर्णसंधी आपल्याला या ठिकाणी मिळते. मुळातच आपण नागपूर शहराचा विचार केला तर याला वनसंपदा आणि व्याघ्र प्रकल्पांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे देखील म्हणतात.
नागपूरची दळणवळणाच्या दृष्टिकोनातून इतर शहरांशी कनेक्टिव्हिटी पाहिली तर ही उत्तम असल्यामुळे लाखो पर्यटकांची या ठिकाणी असलेल्या व्याघ्र प्रकल्प तसेच इतर प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी गर्दी होत असते. याच नागपूर शहराच्या वीस किलोमीटर अंतरावर हे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे. प्रामुख्याने हे प्राणी संग्रहालय 564 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर विस्तारले असून सध्या 115 हेक्टरवरील याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येतात तीन ते चार वर्षात पूर्ण केले जाईल व त्यानंतर हे देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय म्हणून गणले जाणार आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयामध्ये चार प्रकारच्या सफारी शक्य आहेत. त्यामध्ये बिबट्या, वाघ तसेच अस्वल आणि निरनिराळ्या प्रकारचे हरीण, काळवीट तसेच नीलगाय व मोर इत्यादी प्राणी आपल्याला बघता येतात. या प्राणी संग्रहालयाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर प्राणी संग्रहालयांमध्ये पिंजऱ्यामध्ये बंद स्थितीत वन्य प्राणी आपल्याला बघायला मिळतात. परंतु गोरेवाडा संग्रहालय मध्ये मुक्त संचार करणारे प्राणी आपल्याला बघता येतात.
या संग्रहालयात आढळतात देशातील दुर्मिळ हरणांच्या जाती
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी संगाई हरीण आढळते. हे हरीण मणिपूर राज्याची राज्य प्राणी आहे. ही हरीण अतिशय दुर्मिळ असून संपूर्ण देशांमध्ये त्यांची संख्या केवळ 280 आहे. तसेच अल्बिनोस नावाचे पांढरे हरीण देखील या ठिकाणी आढळते.
याच हरणाना बार्किंग डियर किंवा भुंकणारे हरीण असे देखील म्हणतात. या हरणाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे लहान हरीण आहे. याशिवाय या ठिकाणी चितळ, सांबर तसेच नीलगाय आणि मोर हे देखील आढळतात. तसेच या प्राणी संग्रहालय मध्ये दोन वाघ देखील आहेत.
या संग्रहालयाचे तिकीट दर
उन्हाळ्याच्या कालावधीत सकाळी आठ वाजता हे प्राणिसंग्रहालय सुरू होते तर संध्याकाळी सहाला या ठिकाणी जाण्यासाठी शेवटची बस असते. हिवाळ्यामध्ये हीच सफारी सकाळी साडेआठला सुरू होऊन संध्याकाळी चारला बंद होते. आठवड्यातील सोमवार सोडता सर्व दिवस हे प्राणी संग्रहालय चालू असते.
जर आपण या प्राणी संग्रहालयाचे तिकीट दर पाहिले तर ते मंगळवार ते शुक्रवार वातानुकूलित बस चारशे रुपये आणि साधी बस तीनशे रुपये अशा पद्धतीने आहे. तुम्हाला पूर्व बुकिंग करायचे असेल तर तुम्ही www.wildgorewada.com या संकेतस्थळावर भेट देऊन प्री बुकिंग करू शकतात. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जंगल सफारीची हौस असेल तर तुम्ही या ठिकाणी एकदा भेट देणे गरजेचे आहे.