weather News : पुढील चार दिवस कोकण व विदर्भासह राज्याच्या काही भागांत ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. यादरम्यान, मुसळधार पावसासह काही भागांत विजांचा कडकडाट होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागांत मुसळधार, तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यात रविवारी सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुण्यात ०.४ मिमी, कोल्हापूर ३, महाबळेश्वर १६, नाशिक १, सांगली १, साताऱ्यामध्ये ०.४ मिमी पावसाची नोंद झाली.
कोक ण भागातील सांताक्रुझमध्ये ९ मिमी, रत्नागिरी ४, तर डहाणूमध्ये ४७ मिमी पाऊस बरसला आहे. मराठवाड्यातील तुरळक भागांत पाऊस पडला. विदर्भातील गोंदियामध्ये ०.६ मिमी, तर नागपूर १ मिमी पावसाची नोंद झाली.
घाटमाथ्यावरील लोणावळ्यामध्ये ३२ मिमी, शिरगाव ११२, शिरोटा ४७, अम्बोणे ५९, दावडी ८१, डुंगरवाडी ६५, कोयना १२४, खोपोली ३९, ताम्हिणी ५०, तर भिरामध्ये ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमानाची नोंद सोलापूरमध्ये ३३.७ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी तापमान महाबळेश्वरमध्ये १७.७ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.
कोकण भागात १० ते १३ जुलै रोजी मुसळधार पाऊस व किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही ‘यलो अॅलर्ट’ असून, काही भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे.