Marathi News : नवी मुंबई महापालिकेने माझी वसुंधरा अभियानात २०२२-२३ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका ‘क’ वर्ग महापालिकामध्ये राज्यात सर्वप्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
यात ७ कोटींचा पुरस्कार मिळाल्याने महापालिका प्रशासनाचा आत्मविश्वास दुणावला असून, आता याच अंतर्गत प्रशासनाने यंदा सौर प्रकल्पांवर भर दिला आहे. याच अंतर्गत सौर सिग्नल यंत्रणेसह सौर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून,
नवी मुंबई शहराची वाटचाल सौरऊर्जा शहराकडे सुरू असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. २०१२-१३ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका ‘क’ वर्ग महापालिकांमध्ये पहिली,
तर राज्यातील मोठ्या शहरांच्या अ.ब. क वर्ग एकूण महापालिकांमधून नवी मुंबईस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामुळे यंदाही अशीच घोडदौड कायम राखण्याचा चंग आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बांधला असून,
त्या दृष्टीने संबंधित विभागांना कामाला लावले आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या जागांवर सौर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यात अक्षय ऊर्जा, उपकरणे, चार्जिंग स्टेशन, ऊर्जा केंद्र, आणि संबंधित कामे करण्यात येणार आहेत. यावर साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
१० तासांचा बॅटरी बॅकअप
संपूर्ण शहरातील वाहतूक,चौकातील सिग्नलसुद्धा सौरऊर्जेवर चालणारी बसवण्याचे ठरवले आहे. सध्या याबाबत विचार सुरू आहे. सिग्नलवरील सौर पॅनल किती मोठे असावेत, ते वाहतुकीसह सौंदर्यात बाधा तर आणणार नाहीत ना, तसेच वाहतूक पोलिसांचा याबाबत अभियाप्राय विचारात घेण्यात येणार आहे. तसेच बॅटरी बॅकअप कमीतकमी १० तासांचा असावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.